माईंनी संघर्ष करण्याचा मंत्र दिला व जो वसा दिला तो पुढे नेण्याचा प्रयत्न करणार …

ममता बाल सदन मधील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ….माईंनी अनेक अनाथांना दिले स्वतःचे नाव ..

सासवड: कुंभारवळण (ता. पुरंदर) येथील ममता बाल सदनची १९९४ मध्ये स्थापना झाली. सध्या चार ते अठरा या वयोगटातील सुमारे ५० मुली शिक्षण घेत आहेत. त्यांना माईच्या निधनाची बातमी समजताच अश्रू अनावर झाले. प्रत्येक जण आपल्या आठवणीना उजाळा देत होते. आश्रमातील मुलींच्या शिक्षिका मेघा मेमाणे या सुमारे आठ वर्षापासून येथे कार्यरत असून माईचे व्यक्तिमत्व खूप मोठे असल्याचे सांगितले आहे. महिन्या तून किमान दोन, तीन वेळा आश्रमात येत असत, त्यावेळी खूप प्रसन्न वाटायचे, प्रत्येक मुलीची अस्थेवाईकपणे चौकशी करायच्या. अनाथ मुलांच्या बद्दल विशेष आपुलकी होती. परंतु आता त्यांच्या नसण्याचे खूप दुख होत आहे असे सांगितले.

माझा जन्म कसा, कुठे आणि कधी झाला हे माहिती नाही, जन्मानंतर दोन दिवसांची असताना मी अनाथ झाले. माझे आई वडील कुठे सोडून गेले हे मला माहिती नाही, परंतु ज्या आमच्या कोणीच नव्हत्या त्या अनाथांच्या माईनी आम्हाला वाढविले, मोठे केले, शिक्षण देवून आमचे विश्व निर्माण केले. इतक्या वर्षानंतर आज खऱ्या अर्थाने पोरके झाल्याची भावना निर्माण झाली आहे. जगण्यात अर्थ नाही असे वाटत आहे. परंतु माईनी आम्हाला संघर्ष करण्याचा मंत्र दिला जो वसा घेतला. तो मंत्र आणि वसा पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. अशा शब्दात मीना सिंधुताई सपकाळ या विद्यार्थिनीला आपल्या भावना व्यक्त करताना अश्रू लपविणे कठीण झाले होते.

अनाथांची माय म्हणून संपूर्ण देशात परिचित असलेल्या जेष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराचा धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि एका क्षणात होत्याचे नव्हते झाल्याची भावना निर्माण झाली. सर्वत्र एकच आक्रोश सुरु झाला. आई आपल्यात नाहीत हि कल्पनाच मनाला पटत नसल्याचे प्रत्येक विद्यार्थिनी सांगत आहे.

अनिता लोकरे या मुलीने सांगितले कि, १४ नोव्हेंबरला माईचा वाढदिवस आम्ही साजरा केला. त्यांच्यासाठी फुलांच्या पायघड्या आणि मांडव टाकला होता. तो मांडव अदुयाप तसाच असताना हे दिवस पाहायला मिळतील असे स्वप्नातही वाटले नव्हते. जेमतेम चार - पाच महिन्यांची असताना मला आश्रमात आणले गेले. मला कोणीच नव्हते, परंतु माई याच माझ्यासाठी सर्व होत्या.

कौशल्या नेटके या सुमारे १८ वर्षापासून आश्रमात स्वयंपाक बनविण्याचे काम करीत असून त्यांनी माईच्या निधनाबद्दल दुख व्यक्त केले आहे. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितले कि, माईना शांतता आणि कडक शिस्त खूप प्रिय होती. त्यामुळे आम्हाला त्यांच्या समोर जाताना भीती वाटायची. त्यामुळे माई आल्यावर स्वयंपाक घरात शांतता ठेवण्याचा आमचा प्रयत्न असायचा. परंतु आता त्यांचा सहवास परत कधी मिळणार नाही याचे दुख होत आहे.

माया सिंधुताई सपकाळ या विद्यार्थिनीने सांगितले कि, मी चार ते पाच महिन्यांची असताना मला आश्रमात आणले गेले, मला काहीच कळत नव्हते. परंतु माईनी आम्हाला मोठे करून शिक्षण दिले. आज इलेक्ट्रॉनिक च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. माझी आई आणि वडील माईच असल्याने माईचेच नाव दिले. तर कविता आणि अश्विनी बटाव या बहिणींनी सांगितले कि, आमच्या मामानी पाच वर्षांची असताना नाशिक वरून इथे आणून सोडले. परंतु माईनी आमच्या जीवनाला आकार दिला.

—————————————————————
पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल दुख व्यक्त करताना त्यांच्या जाण्याने हजारो चिमुरड्यांची मायेची ऊब अन माझ्यासारख्या असंख्य समाज सेवकांचा आदर्श आज काळाने हिरावून घेतला आहे. अशी माई पुन्हा होणे अशक्य असल्याची भावना व्यक्त केली आहे.
————————————————————————
माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल तीव्र दुख व्यक्त केले आहे. माईचे माझ्यावर खूप प्रेम होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मला भेटीचे त्यांनी निमंत्रण दिले होते, परंतु प्रकृतीमुळे त्यांची भेट होवू शकली नाही. त्यांच्या जाण्याने अनाथांचा मोठा आश्रय गेला. त्यांचे काम कोणीही विसरू शकणार नाही, त्यांनी तेवत ठेवलेली ज्योत त्यांनी वाढविलेली मुले आणि आमच्यासारखी मंडळी पुढे नेण्याचा प्रयत्न करू.
———————————————————————————————
आमदार अशोक टेकवडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सिंधुताई सपकाळ या आदर्श माता होत्या. त्यांनी निराधार, अनाथ बालकांना आपल्या पंखाखाली घेवून जगण्याचे बळ आणि सामर्थ्य दिल्याचे सांगितले आहे. त्यांची प्रेरणा घेवून सामाजिक जीवनात काम करणारी आमच्या सारखी मंडळी त्यांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करतील तीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published.